कोकणातील ‘हापूस’ला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’चा पुढाकार

मुंबई : कोकणातील वातावरणात वाढता उष्मा, अनियमित हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न काहीसे घटले असताना कोरोना साथचे प्रमाण पुन्हा वाढल्याने हापूसच्या व्यापाराला फटका बसत आहे. शिवाय काही विमानकंपन्यांनी परदेशातील हापूस निर्यातीसाठी भाडेवाढ केली आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूसची गोडी चाखता यावी यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ ने पुढाकार घेतला आहे.
”यंदा कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे. परदेशी विमान वाहतूक बंद असल्याने अनेक ठिकाणी यंदा हापूसची निर्यात करणे शक्य नाही. शिवाय कोरोना महामारीमुळे हापूसचा बाजारपेठेतील एकंदरीत व्यवहार, परदेशातील निर्यात या सगळ्यांवर परिणाम होत आहे. या सर्व आव्हानांना सामोरे जात कोकणातील शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना मुंबई, महाराष्ट्रसह परदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” असे ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. ”युरोप आणि युकेमध्ये हापूस आंब्याला एक वेगळाच मान असून मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. ३१ मार्चला लंडन, जर्मनी आणि हॉलंडला १ हजार डझन हापूस निर्यात करण्यात आले.” असेही ते पुढे म्हणाले.
‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’च्या या संपूर्ण उपक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा या सर्वांचे सहकार्य लाभले आहे. कोकणातून हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. मार्चच्या मध्यापासून ही आवक वाढते. मात्र यंदा ही अवाक मर्यादित प्रमाणात होत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असताना शेतकऱ्यांनी न थांबता आंब्याची थेट विक्री केली. यामुळे त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. शेतातील हापूस ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापारी, बाजारपेठ यांच्यावर अवलंबून असणारा कोकणातील शेतकरी आता अधिक स्वावलंबी बनत आहे. कोकणातील १०० शेतकर्यांनी एकत्र येत बनवलेल्या ‘मायको’ या देशातील पहिल्या डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे आंबा विक्रीच्या पारंपरिक पद्धतीत बदल पहायला मिळत आहे.
”आंब्याच्या सीझनमध्ये बाजारपेठेत अनेकदा भेसळयुक्त, रासायनिक फवारणी करून पिकवलेले आंबे पहायला मिळतात. पण ही सर्व पद्धती मोडून काढत मुंबई, महाराष्ट्रसह जगभरातील आंबा प्रेमींना कोणतीही भेसळ नसलेला अस्सल हापूसचा आस्वाद देणे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत” असे ‘मायको’चे सीईओ दिप्तेश जगताप म्हणाले. http://www.mykofoods.com/ या मँगोटेक प्लॅटफॉर्ममुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत आहे. ”मायकोच्या माध्यमातून शेतकर्यांना जगभरातील बाजारपेठ आंब्याच्या थेट विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने त्यांना योग्य तो मोबदला मिळत आहे. या माध्यमातून रत्नागिरी, राजापूर, देवगड आदी भागांत शेतात पिकवलेला आंबा थेट घरपोच मिळत आहे.” असे ‘मायको’च्या सह संस्थापक सुनयना रावराणे म्हणाल्या. ”मुंबई प्रमाणे परदेशातही ग्राहकांना थेट घरपोच आंबे पोहोचवण्यात येत असून भारतातील निर्यातदार दिपक परब आणि लंडनमधील इम्पोरटर तेजस भोसले या सगळ्याचे नियोजन करत आहे.” असेही त्या पुढे म्हणाल्या. आंब्याच्या प्रत्येक पेटीवर असणार्या विशेष क्यूआर कोडच्या स्कॅनिंगद्वारे ग्राहकांना आंब्यांची लागवड कोणत्या शेतात आणि कधी करण्यात आली, शेतकर्याने कसे परिश्रम घेतले, त्याची बाग याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे पाहता येईल.