Top Newsअर्थ-उद्योग

एअर इंडियामध्ये आमुलाग्र बदल करण्याचा टाटा ग्रुपचा निर्धार

नवी दिल्ली : एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समुहाकडे सोपविण्यात आली. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एअर इंडियाची मालकी स्वीकारताच टाटा ग्रुपनं सर्वात आधी एअर इंडियाच्या लेटलतीफपणाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या विमानांचं उड्डाण निर्धारित वेळेत होईल याची पुरेपूर काळजी घेण्याला टाटा ग्रुप प्राधान्य देणार आहे. लेटलतीफपणासोबतच एअर इंडियामध्ये आणखी काही अमूलाग्र बदल करण्याचा टाटा ग्रूपनं निर्धार केल्याचं बोललं जात आहे. यात विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रूचा पेहराव देखील बदलला जाण्याची शक्यता आहे. टाटा ग्रूपचा हॉटेल इंडस्ट्रीमध्येही मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना उत्तम गुणवत्तेचं जेवण देण्याचा टाटा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

एअर इंडियामधील सरकारचा समभाग टाटा सन्सची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला. आता एअर इंडियाची मालकी अधिकृतपणे टाटा कंपनीकडे गेली आहे. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर टाटा समुहानं एक विशेष फोटो शेअर करत एअर इंडियाचं स्वागत केलं.

टाटा समुहानं आपल्या ट्वीटरवर एअर इंडियाचं स्वागत करत ‘Excited to take off with you!’ असा संदेश लिहिला आहे. यासोबतच एक सुंदर फोटोही टाटा समुहानं रिट्वीट केलाय. ‘टाटा समुहाच्या एका भागाच्या रुपात एअर इंडियासाठी आता नवा चॅप्टर सुरू होत आहे. प्रवास पुढे नेण्यासाठी आता दोन आयकॉनिक नावं एकत्र आली आहेत. आपल्या देशसेवेची मोहीम आणि आमचा बहुमूल्य वारसा सोबत काम करण्यासाठी उत्साहित आहेत. टाटा कंपनीचं स्वागत,’ असं ट्वीट एअर इंडियानं केलंय. तसंच कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीदेखील कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं. याशिवाय चंद्रशेखरन यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली.

एअर इंडियाची मालकी टाटा कंपनीकडे येण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. एअर इंडियाच्या घरवापसीचा आम्हाला खूप आनंद आहे. एअर इंडियाला वर्ल्ड क्लास दर्जाची एअरलाइन्स कंपनी बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं टाटा सन्सनचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी म्हटलं.

लेटलतीफपणासोबतच एअर इंडियामध्ये आणखी काही अमूलाग्र बदल करताना विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रूचा पेहरावदेखील बदलला जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाचा हॉटेल इंडस्ट्रीमध्येही मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना उत्तम गुणवत्तेचं जेवण देण्याचा टाटा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आता एअर इंडियाच्या सर्व विमानांमध्ये रतन टाटा यांची एक ऑडिओ क्लिप देखील प्रवाशांना ऐकवली जाणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा ग्रूपनं एअर इंडियामध्ये १०० टक्के हिस्सेदारीसाठी १८ हजार कोटींचा करार केला. एअर इंडियासाठी ही बोली टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टॅलेस प्रायव्हेड लिमिटेडच्या वतीनं लावण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button