Top Newsस्पोर्ट्स

यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार : सौरव गांगुली

कोलकाता : यंदाची आयपीएल २०२२ स्पर्धा भारतातच होणार आहे. परंतु, हे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आयपीएलचे आयोजन दुबई किंवा इतर कोणत्याही देशात केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, ही स्पर्धा देशात खेळवली जाणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नुकतेच सांगितले होते की, आयपीएलसाठी खेळाडूंचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर ‘टाटा’ ग्रुप असेल. यावेळी १२०० हून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून त्यात ३०० हून अधिक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या मते, पुढील हंगामासाठी सुमारे २१७ खेळाडू खरेदी केले जातील, त्यापैकी ७० परदेशी खेळाडू असतील.

आयपीएलचा आगामी सीझन अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण यंदा ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबादचे संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या वेळी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यावेळीही ट्रॉफीसाठी रोमांचक लढत होणार आहे.

लखनौ संघाने ड्राफ्टमधून सलामीवीर केएल राहुल, अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांची निवड केली आहे. केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णयही जवळपास निश्चित झाला आहे. याशिवाय अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू रशीद खान आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांचा ड्राफ्टमधून समावेश केला आहे. याशिवाय संघाने हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही संघ पुढील हंगामात आकर्षणाचे केंद्र असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button