येत्या १० जूनला यंदाचे पहिले सूर्यग्रहण

मुंबई : सन २०२१ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. पैकी पहिले सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी लागणार आहे. यंदाच्या वर्षीचे सूर्यग्रहण वैशाख अमावास्येला लागत असून, या दिवशी शनैश्चर जयंती आहे. वैशाख अमावास्येला भावुका अमावस्या असेही म्हटले जाते. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रावर लागेल. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असून, भारताच्या काही भागात दिसेल, असे सांगितले जात आहे. यंदाचे पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नाही. जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, लडाख या भागांमध्ये अंशतः दिसेल.
सूर्यग्रहण ही पूर्णपणे खगोलीय घटना असली, तरी धार्मिकदृष्ट्या याला अधिक महत्त्व आहे. सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये, याचे वर्णन आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये आढळून येते. शास्त्रांमध्ये सूर्यग्रहणावेळी पाळावयाचे काही नियमही सांगितलेले आढळून येतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. याला सूर्यग्रहण असे म्हणतात. अमावस्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू नेहमी वक्री चलनाने मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही.
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत अनेक धार्मिक मान्यता सांगितल्या जातात. ग्रहण काळात पूजा आणि इतर धार्मिक कामे करू नये. ग्रहण काळात जेवण बनवणे आणि खाणेही अनेकजण टाळतात. भगवंताचे नामस्मरण करावे. सूर्यमंत्र, गायत्री मंत्रांचा जप करावा, असे म्हटले जाते. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादी तसेच अन्य नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.




