Top Newsफोकस

महाराष्ट्रावरचे हे मोठं संकट, मदतीत कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक गावात पूर आला आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरग्रस्तांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना मदतीचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंनी पत्र लिहून सांगितलं आहे की, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असं आवाहन आहे. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल असं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

त्याचसोबत तुम्ही सगळ्यांनी लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहचेल असं पाहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याविषयी माहिती देण्यात आली. एनडीआरएफच्या एकूण १४ तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहचल्या असून त्यांची जिलहानीहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे : पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १, कोल्हापूर २, एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची १ टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या २ , नौदलाच्या २ तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत. राखीव तुकड्या अंधेरी येथे – २ , नागपूर येथे १ , पुणे येथे १ , एसडीआरएफ धुळे येथे १ , आणि नागपूर येथे १ अशा तैनात करण्यात आल्या आहेत. आज दुपारपर्यंत एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून येत आहेत

पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून ५० फुटांवरून वाहू लागली

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सलग तिसरया दिवशी तुफान पाऊससुरू असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य सर्व नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षितठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे.वाहतूक तसेच नागरी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून तासागणिक वाढणारा पाऊस आणि नद्यांची पातळी यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button