Top Newsराजकारण

पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून चूक नाही; मुख्यमंत्री चन्नी यांचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा ताफा रोखल्यानंतर काँग्रेस-भाजप आमने-सामने

मोहाली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि यामुळे मोदींना सुमारे अर्धा तास अडकून राहावे लागले. या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक परतावे लागले याचे मला दु:ख आहे. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी भटिंडाला जाणार होतो, पण माझ्यासोबत आलेले काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कात मी आल्यामुळे पंतप्रधानांना रिसीव्ह करायला जाणे टाळले.

ते पुढे म्हणाले की, खराब हवामान आणि विरोधामुळे आम्ही त्यांना (पीएमओ) यात्रा थांबवण्यास सांगितले होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक त्यांचा ताफा रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी झाली नाही. मी रात्री उशिरापर्यंत मोदींच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था पाहिली होती, असे चन्नी म्हणाले.

नरेंद्र मोदींवर हल्ला झाला नाही

ते पुढे म्हणाले की, रस्त्याने येत असताना पंतप्रधानांचा ताफा अडवण्यात आला, पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नाही. असा विचारही कुणी करू शकत नाही. दिल्लीत शेतकरी आंदोलन झाले, त्यांच्या काही मागणी होत्या, ज्या १ वर्षानंतर पूर्ण झाल्या. याबाबतच आज शेतकरी शांततेने आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले होते. त्या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडले जाऊ नये. अशाप्रकारचे राजकारण कुणी करू नये, असेही ते म्हणाले.

गृहमंत्रालयाकडून संताप

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी हे बोलून नक्कीच आपल्या सरकारचा बचाव केला आहे, पण भाजप आणि गृहमंत्रालय या दाव्यांचे खंडन करत आहे. गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती पंजाब सरकार आणि पोलिसांना देण्यात आली होती. पंतप्रधान हेलिकॉप्टरऐवजी रस्त्याने येणार, हे पोलिसांनाच माहित होते. पण तरीही एवढी मोठी चूक झाली आणि त्यांचा ताफा मध्येच थांबवण्यात आला. गृह मंत्रालयाच्या वतीने पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

फिरोजपूरचा एसएसपी निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यानंतर मोदींना पंजाब दौरा रद्द करावा लागला. या घटनेची पंजाब सरकारने दखल घेतली असून फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ही चिंताजनक घटना : नड्डा

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. ‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

नड्डांना सुरजेवाला यांचे प्रत्युत्तर

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नड्डा यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘प्रिय नड्डाजी, पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होतं. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेनं रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे’, अशी घणाघाती टीका सुरजेवाला यांनी केलीय.

स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते” असं म्हणत स्मृती इराणी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच “पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते.

पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास जाणूनबुजून खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला. २० मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचवलं? असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button