संजय राठोड यांना पोलिसांकडून ‘क्लिन चिट’ देण्याचा प्रश्नच नाही : वळसे-पाटील

पुणे : आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही, असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून संजय राठोड यांना ‘क्लिनचिट’ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली झाली आहे. याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही, असे वळसे-पाटील म्हणाले आहेत.
पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात”आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही” असे त्यांनी म्हटल्याची माहिती झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणाचा आमचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.