राजकारण

ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगाने विवेक दुबे आणि अजय नायक यांना अहवाल सोपवण्याचे आदेश दिले होते. चार पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा पायाला झालेल्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी केला होता. निरीक्षकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्याच्या शक्यता नाकारल्या असल्याचे अहवालात म्हटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ज्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचे म्हणत मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना रविवारपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर निवडणूक आयोगाने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. स्पेशल पोलिस आॅब्झर्व्हर विवेक दुबे आणि स्पेशल आॅब्झर्व्हर अजय नायक यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, यानंतर निवडणूक आयोगाला आपला अहवाल पाठवून दिला. पश्चिम बंगाल सरकारने दिलेल्या माहितीनुसार नंदीग्राम येथे १० मार्च रोजी ममता बॅनर्जी यांना गाडीच्या दरवाज्यामुळे दुखापत झाली. परंतु त्यांच्या पायाला गाडीचा दरवाजा कसा लागला याबाबत मात्र माहिती देण्यात आली नव्हती. सरकारच्या या अहवालात ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत कशी झाली याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे निवडणूक आयोगाला दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button