आर्यन खानच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, व्हॉट्सअॅप चॅटमध्येही आक्षेपार्ह काही नाही !
हायकोर्टाचा एनसीबीला धक्का; वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, असा कोणताही पुरावा नाही, ज्यावरून आरोपीने हा गुन्हाचा कट रचला होता हे सिद्ध होतं. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हे मान्य केले तरी या प्रकरणात कमाल शिक्षा एक वर्षाची आहे. सुमारे २५ दिवस आरोपी तुरुंगात आहेत. संबंधित वेळी त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. आर्यन खानच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला २६ दिवसांनंतर २८ ऑक्टोबरला हायकोर्टातून जामीन मिळाला. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आर्यन खानची ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली. हायकोर्टाने आर्यन खानला १४ अटींसह जामीन मंजूर केला होता. यामध्ये प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहून आपली उपस्थिती लावावी, अशीही अट होती. खटल्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आर्यन खान परदेशात जाऊ शकणार नाही, असेही सांगण्यात आले.
वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी
आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. म्हणजे हा फर्जीवाडा होता, हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असं सांगतानाच हा फर्जीवाडा करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना निलंबित करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी सांगितलं.
आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे. अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असे ते म्हणाले. समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्र सरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्याचे तात्काळ निलंबन करावे. आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.