Top Newsराजकारण

…तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : देशभरात ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. ‘पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच’ अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच निर्बंध पाळावेत नाहीतर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा आलं आहे. आपल्याकडे ते येऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्याने साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला” असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच “आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश कोरोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणार ही प्रतिज्ञा आपण करुयात, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button