Top Newsराजकारण

…तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीची सत्ता आली असती : शरद पवार

अजित पवार-फडणवीसांच्या शपथविधीवर प्रथमच खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. त्यावरून टीका-टिपण्णीही केली जाते. याबाबत बोलताना, सन २०१९ मधील राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत पाठवले, अशी चर्चा होती, हे खरे आहे. पण, मी त्यांना पाठवले असते, तर त्यांनी राज्यच बनवले असते. त्यांनी अर्धवट काही काम केले नसते. मीच अजित पवार यांना पाठवले होते यात काहीच अर्थ नाही. मात्र, माझे एक वक्तव्य शिवसेना आणि भाजपतील अंतर वाढायला फार उपयोगी पडले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीबाबत नवनवे गौप्यस्फोट अजूनही होत असतात. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीतून शिवसेनेला आघाडीत आणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांनी तेव्हाच्या घडामोडींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेकविध विषयांवर रोखठोक मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट बहुमत कुणाकडेच नाही, हे स्पष्ट झाले होते. युती म्हणून पाहिले, तर शिवसेना आणि भाजपकडे बहुमत होते. मात्र, शिवसेना आणि भाजप एकत्र राहणार नाही, हे आम्हाला दिसले होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येऊ पाहणाऱ्या भाजपला बाजूला करायचे असेल, तर त्यांना सोयीची भूमिका घेणे शक्य नव्हते, असे शरद पवार म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजप शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता, अशीची चर्चा सुरू होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य करून वस्तुस्थिती स्पष्ट केली.

निवडणूक झाल्यावर दिल्लीत पहिल्यांदा एक विधान केले की, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेल, तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझे ते एक विधान शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढायला फार उपयोगी पडले, असे शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, ते दोघे एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरते पोषक वक्तव्य केल्याने नुकसान होणार नव्हते. माझ्या या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात ही शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली, असेही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदींशी राष्ट्रवादी-भाजपने एकत्र येण्यावर चर्चा

हे खरे आहे की, माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितले की, हे शक्य होणार नाही. आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही. आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असे सांगितले. त्यानंतर दीड महिने सरकार स्थापन झाले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपत खूप अंतर वाढले होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button