…तर भाजपचे १८ आमदार निलंबित झाले असते : अजित पवार

मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून काल विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे. राज्यपाल सत्ताधारी पक्षांनी पाठवलेल्या १२ आमदारांच्या फाईलवर कार्यवाही करत नसल्यानं भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आले, अशी चर्चा कालपासून सुरू आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज भाष्य केलं. निलंबनाची कारवाई जाणूनबुजून करण्यात आलेली नाही, असं पवारांनी सांगितलं.
निलंबनाची कारवाई जाणूनबुजून करण्यात आलेली नाही. राज्यपालांनी १२ आमदार प्रलंबित ठेवले म्हणून १२ आमदार निलंबित केलं अशातला काही भाग नाही. त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यातल्या काही त्यांनी स्वत:हून मान्यदेखील केल्या. पण १२ विरुद्ध १२ असं काही नाही. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ अशातला तो प्रकार होता. त्यांच्या १८ आमदारांनी गोंधळ घातला असता तर १२ च्या जागी १८ आमदार निलंबित झाले असते, असं अजित पवार म्हणाले.
तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव अतिशय संयमानं वागल्याचे कौतुकोद्गार अजित पवारांनी काढले. भास्कर जाधव यांचा स्वभाव माझ्यासारखाच तापट आहे. त्यांना राग येतो. मात्र तापट स्वभाव असतानाही काल ते शांत होते. त्यांनी सगळ्या गोष्टी मुद्देसूदपणे सांगितल्या. समोर इतका गोंधळ असताना, अपशब्द वापरले जात असतानाही ते शांत राहिले. शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांच्या शेजारीच बसले होते.