
दुबई : आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरु झाला. कालपर्यंत स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळले गेले. यातून चार संघ सुपर १२ साठी निवडले गेले. आजपासून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात होत आहे. आज ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर १२ मधील सामन्यांना सुरुवात होत आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुबईत खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.
भारत उद्या २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट २ मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० पासून खेळला जाईल.
शेवटचा टी-ट्वेंटी विश्वचषक २०१६ मध्ये भारतात खेळला गेला. यंदाही ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली. बीसीसीआय या स्पर्धेचे यजमान आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला (वेस्ट इंडीज) आपल्या जेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान असेल. जर ते यात यशस्वी झाले, तर असे करणारा तो जगातील पहिला संघ असेल.
या मैदानावर सामने खेळले जातील
यंदाचे टी-ट्वेंटी विश्वचषक सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला जाईल.
टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट २ मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वालिफायर फेरीनंतर त्यात ग्रुप बी चा विजेता संघ स्कॉटलॅंड आणि ग्रुप ए चा उपविजेता संघ नामिबिया यांचा समावेश झाला आहे तर गट १ मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. क्वालिफायर फेरीनंतर, गट अ चा विजेता संघ श्रीलंका आणि गट ब चा उपविजेता संघ बांग्लादेशचा समावेश झाला आहे.
यानंतर या स्पर्धेचा बाद फेरीचा टप्पा सुरू होईल. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी १० नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी ११ नोव्हेंबरला खेळली जाईल. तर टी-ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीसाठी १५ नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.
ही गुण पद्धती असेल
टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात विजेत्या संघाला दोन गुण दिले जातील. दुसरीकडे, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गट १ आणि गट २ मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
टी-ट्वेंटी विश्वचषक सामने कुठे पाहू शकता?
आपण स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स २ वर टी-ट्वेंटी विश्वचषक सामने थेट पाहू शकता. याशिवाय, स्टार स्पोर्ट्स ३ आणि स्टार स्पोर्ट्स एचडी चॅनेलवरही सामना थेट प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना डिस्ने हॉटस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर तुमच्या मोबाईलवर थेट पाहू शकता. क्रिकेट चाहत्यांनाही टी-२० वर्ल्डकपचा आनंद थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. हे सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ हून अधिक शहरांमधील ७५ हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जातील.
स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
३१ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
३ नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
५ नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड
नोव्हेंबर ८: नामिबिया वि भारत