गरज आहे त्यांच्यावर बंदी घातली जात नाही; रझा अकादमीची भाजप, संघावर टीका
मुंबई : राज्यातील काही भागात हिंसाचार झाला आहे. त्याच्याशी रझा अकादमीचा संबंध नाही. आम्ही शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही हिंसा घडली. या मागे कोण आहे हे माहीत नाही. केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असून दंगखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी सांगितलं. तसेच जे मॉब लिंचिंग करतात, ज्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, अशा शब्दात नुरी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला.
रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दंगल भडकविण्याचे आरोप फेटाळून लावले. आम्ही बंदचं आवाहन केलं होतं. शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. कोणावरही जबरदस्ती करू नका सांगितलं होतं. आम्ही हिंसेचा निषेध नोंदवतो. पोलिसांनी दंगेखोरांवर कठोर कारवाई करावी, असं नुरी म्हणाले. जे दंगेखोर आहेत त्यांना पोलिसांनी अटक करावी. ज्यांनी काही केलं नसेल त्यांनी पोलिसांनी बोलावल्यास जावं आणि त्यांना सत्य परिस्थिती सांगावी. कुणीही घाबरू नये. ज्यांनी पैगंबरांवर टीका केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. त्यासाठीच आम्ही बंद पुकारला होता, असं सांगतानाच आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत मोर्चे, आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. त्याच मार्गाने आम्ही गेलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे सध्याचं सरकार फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती वापर आहे. समाजात फूट पाडली जात आहे. आपली राजकीय दुकानदारी चमकवण्यसाठी हे सुरू आहे. त्यामुळे कुणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये. या गोष्टी कोण करत आहे ते सर्वांना माहीत आहे. हेच लोक दंगे घडवून आणत आहेत. मुस्लिमांना टार्गेट करत आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष कधीच अशा गोष्टी करत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी भाजपचं बाहुलं आहे, अशी टीका केली होती. नुरी यांनी हा आरोप फेटाळून लावला. आमच्या नावावर काहीही राजकीय टिप्पणी केली जात आहे. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. भाजपशी तर नाहीच नाही, असं त्यांनी सांगितलं. ज्यांच्यावर बंदी घालावी त्यांच्यावर बंदी घातली जात नाही. जे मॉब लिचिंग करतात, बंदुका वाटतात त्यांच्यावर बंदी घातली जात नाही. मात्र रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही आजवर कधीच चुकीचं विधान केलं नाही. चुकीचं काही सांगितलं असेल तर दाखवून त्या. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडतो. जे घडतं तेच सांगतो. आता मात्र केवळ राजकारण सुरू आहे. त्यात वास्तव काहीच नाही. हे सर्व राजकारण सुरू आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले.