राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवस !
मुंबई : राज्याचं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला आहे.
पावसाळी अधिवेशन हे येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधक करत होते. मात्र, सरकारने केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.
१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर सरकारला तेराव्याची भीती : मुनगंटीवार
कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकार आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत माध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १४ दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केलीय.
ठाकरे सरकारला भीती वाटतेय. ४ दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर १४ दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकते’, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावलाय. तर नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत, दुसरीकडे अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निवड झाली नाही, याबाबत विचारलं असता, ‘या तिन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. १९ तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र डागलंय.