Top Newsफोकस

‘गुलाब’ वादळ आणि आभाळ फाटलं; मराठवाड्याची दाणादाण, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत.

जवळपास २२ लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे ४३६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच १९६ जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

रेड व ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले.

अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी ७ हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली. मराठवाड्यातील
नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची पाळी आली आहे. तर नदी नाले ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणी क्षमता असलेल्या धामणी धरणाचे रात्री दहा वाजता पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडण्यात येणार असून धामणी आणि कवडास मिळून १३ हजार ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अति मुसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. काढणीस आलेले सोयाबीन पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे अकरा तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पावसामुळं खरीप पिकासह बागायती पिकांना फटका जिल्ह्यात गुलाबी वादळाचे काटे शेतकऱ्याचा अंगाला रुतले आहेत. नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.

वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. काढणीला आलेले सोयबीन, उडीद, मूग पिकांचं मोठं नुकसान झाल आहे. मात्र अद्याप पंचनामे झालेले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टोगावातील शेतशिवार परिसरात नुकसानग्रस्त शेतातील चिखलात बसून आंदोलन करण्यात आले. नुकसान भागाचे सर्वे होऊन भरपाई मिळावी अशी मागणी आता स्वाभिमानी कडून करण्यात येत आहे

जळगाव जिल्ह्यातही कहर

जळगाव जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरु आहे. मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने डोंगरी आणि तितूर नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव शहरातील अनेक भागात पाणी शिरल्यानं या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली. यामध्ये शंभरहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने नदी काठ परिसरात असलेल्या शहरातील दर्गा परिसर, मोची गल्ली, एकलव्य नगर परिसरात नागरिकांच्या घरात कंबरेएवढं पाणी शिरल्याने घरातील सामानाचं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळाले.

बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक महामार्ग बंद

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागात हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर असंख्य गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून काल रात्रीपासून गावे अंधारात आहेत व आजही अंधारातच राहणार चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील पैनगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, धामना, पेन, कोराडी, यासह छोट्या मोठ्या नद्या व नाल्यांना पूर आले आहेत. जिल्ह्यातील ९ ठिकाणी रस्ते बंद झाले असून त्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उस्मानाबादमध्येही नदीकाठच्या गावांमध्ये पाणी

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ४५९ पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी आणि १६ अन्य बाधितांना एनडीआरएफ टीमच्या मदतीने वाचवण्यात यश मिळवले. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या १३६.७८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. काही गावांमध्ये गावकरी पुराच्या पाण्यात अडकले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने ग्रामस्थांचे बचाव कार्य सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि १६ लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमची मागणी केली प्रमुख मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले. यामुळे धरणाच्या खाली असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार, दौतपूर येथील शेतात अडकलेल्या सहा व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button