Top Newsराजकारण

फडणवीसांच्या बोलण्यातून सत्तेची हाव स्पष्ट; खडसे यांची टीका

जळगाव : ओबीसी आरक्षणाबाबत आज जी परिस्थिती, त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस अन् भाजप जबाबदार आहे. ओबीसी आरक्षण कसं मिळवून द्यायचं, याबाबत सूचना करणे ठीक आहे, पण ‘तुम्ही सत्ता द्या, मगच मी तुम्हाला आरक्षण देतो’, असं म्हणणे म्हणजे तुम्ही सत्तेसाठी किती हापापले आहात, हे दिसतंय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

फडणवीस यांनी संन्यास घेण्याच्या भाषा अगोदरही केल्या आहेत. विदर्भाचं आंदोलन सुरु असताना त्यांनी त्यावेळी म्हटलं होत की, विदर्भ जर वेगळा झाला नाही तर तर आपण लग्न करणार नाही. पण विदर्भ काही वेगळा झाला नाही, मात्र फडणवीस यांनी लग्न केलं. मुलगीही झाली. तरी त्यांनी आपलं आश्वासन पूर्ण केले नाही. त्यानंतरचा विचार केला तर राष्ट्रवादी पक्षाशी युती कधीही करणार नसल्याचं म्हटलं होतं, अगदी वेळ आलीच तर अविवाहित राहणं पसंत करेल, मात्र राष्ट्रवादिशी कधीही युती करणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र याच लबाडाने सकाळी पाच वाजता युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता ओबीसी आरक्षण प्रश्नावर ही ते सत्तेच्या लालचेपोटीच राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करीत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी यांनी तत्व सोडली आहेत. विश्वा मित्राचा पवित्रा दाखवत आहेत, असा आरोपही खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केला.

खडसे यांनी म्हटलं आहे की, भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणीस यांचं नेतृत्व उदयास आले तेव्हापासून ओबीसी नेत्यांवर अन्याय्य सत्र सुरु झाले. कोणीही ओबीसी नेता आपल्याला डोईजड होऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, त्याच उत्तम उदाहरण माझं स्वतःचं आहे. काहीही कारण नसताना माझ्या विरोधात अनेक चौकशा लावण्यात आल्या, ओबीसी नेत्यांना छळ करण्याचा हा प्रयत्न आहे. कशासाठी बावनकुळे आणि आमच्या सारख्या नेत्यांची तिकिटे कापली. ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारलं, पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी यांनीच प्रयत्न केले. माझ्या मुलीच्या पराभवसाठीही कोणी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे. एकीकडे तिकीट द्यायचं आणि त्यांनीच पराभवासाठी प्रयत्न करायचे, अशी यांची नीती आहे. कशासाठी आमचा वारंवार छळ केला. ओबीसी हा यांच्यासाठी केवळ वापर करण्याचं साधन आहे.

मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळीही भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. व्ही. पी. सिंग यांचा पाठिंबा काढला आणि ते सरकार कोसळलं ते एकाच मुद्यावर कोसळलं होतं, आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते, मग तुम्ही का नाही केले?, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

२०११ रोजी ओबीसींची जातनिहाय गणना झाली, जन गणना केंद्र सरकार करीत असल्याने डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. हा डाटा मिळविण्यासाठी देवेंद्र फडणीस यांनी मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे, तशीच मागणी पंकजा मुंडे यांनीही केली होती. मात्र दिल्लीत भाजपाच सरकार असताना आणि तुम्ही राज्यात सत्तेत असताना, तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडे पणाचा आहे. या सर्व प्रकाराला तुम्हीच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात, असा थेट आरोप खडसे यांनी केला आहे.

खडसे म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आता पावले उचलली असून त्यासाठी मागास वर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. त्यासाठी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार ओबीसीची जनगणना करण्यासाठी सूचना करू शकणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. आकडेवारी आली की, काम होणार असले तरी इतकी वर्षे वाया गेली आहेत, मागच्या काळातच मोदी यांनी डाटा दिला असता, तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही ओबीसींना आरक्षण मिळू शकले असते. आता जे झालं आहे, तो सुप्रीम कोर्टाने पूर्वी निर्णय दिला आहे. त्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली असती तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे, अशी युज अँड थ्रोची भूमिका देवेंद्र फडणीस यांची आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आपण सांगू शकतो. एकीकडे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं सांगायचं आणि दुसरीकडे त्यांचे पाय खेचायचे, असा प्रकार फडणवीस यांच्या कार्यकाळात नेहमीच पाहायला मिळाला आहे. ओबीसींना आरक्षण मिळण्यासंदर्भात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणीस आणि भाजप हेच जबाबदार आहेत, असा आरोपही खडसे यांनी यावेळी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button