
डेहराडून : उत्तराखंडच्या पर्वतरागांमध्ये असणारे प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराची दारं तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आज सोमवारी पहाटे ५ वाजता उघडण्यात आली. यावेळी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी तब्बल ११ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचं संकट असल्याने मागील वर्षी भाविकांना दर्शनासाठी परवानगी नव्हती, त्याप्रमाणेच यंदाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविनांना प्रवेश देण्यात आलेला नाही.
संपूर्ण जगात ११ वे ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणाऱ्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची कवाडं सोमवारी पहाटे ५ वाजता परंपरागत पूजा- अर्चा पार पडण्यानंतर उघण्यात आली. मेष लग्नाच्या शुभमुहूर्तावर हा विधी पार पडला. मी बाबा केदारनाथ यांच्याकडे सर्वांनाच निरोगी ठेवण्याची प्रार्थना करतो, असे ट्विट उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केले आहे. यासह मंदिरात भाविकांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरीही, भाविकांनी घरुनच केदारनाथाला नमस्कार अर्पण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विश्व प्रसिद्ध ग्यारहवें ज्योर्तिलिंग भगवान केदारनाथ धाम के कपाट आज सोमवार को प्रातः 5 बजे विधि-विधान से पूजा-अर्चना और अनुष्ठान के बाद खोल दिए गए। मेष लग्न के शुभ संयोग पर मंदिर का कपाटोद्घाटन किया गया। मैं बाबा केदारनाथ से सभी को निरोगी रखने की प्रार्थना करता हूं। pic.twitter.com/ZTjeN4n5jM
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) May 17, 2021
चारधाम यात्रेवर कोरोनाचं संकट
देशात कोरोनाचं सकंट कायम असून सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. केदारनाथ धाम मंदिर प्रमाणेच चारधाम यात्रेवरही कोरोनाचं सावट यंदा आहे. १८ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचीही दारं परंपरागत तिथीप्रमाणे उघडण्यात येणार आहेत. पहाटे सव्वाचार वाजताच्या ब्रह्ममुहूर्तावर ही दार खुली करण्यात येणार असून पुरोहित आणि मंदिर न्यास समितीतील २५ जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी १४ आणि १५ मे रोजी यमुमोत्री आणि गंगोत्री मंदिराची दारं उघडण्यात आली होती.