आरोग्य

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णाचा पहिला मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती टोपे यांनी माध्यमांना दिली आहे. मृत झालेल्या व्यक्तीचं वय ८० असून ते अन्य आजारानेही पीडित होते.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रत्नागिरीत ९, जळगाव ७, मुंबई २ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण समोर आले होते. महाराष्ट्र आरोग्य विभागाने मागील आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचं बदलेलं रुप डेल्टा प्लस व्हेरिएंट कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. हा नवा डेल्टा प्लस भारतात सर्वात आधी समोर आला आहे. तो डेल्टा बी१.६१७.२ या म्यूटेशन आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे डेल्टा व्हेरिएंटच कारणीभूत होता.

टोपे म्हणाले की, पहिला डेल्टा होता त्यानंतर डेल्टा प्लस आला, डेल्टाने त्याचे रुप बदललंय का? याच्याबाबत सध्या बारकाईनं अभ्यास सुरू आहे. ३७ जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला १०० नमुने घेतले आहेत. त्यांची ट्रॅवल हिस्ट्री, त्यांनी लसीकरण केले होते का? हे तपासलं जात आहे. केंद्राकडूनही मदत घेत आहोत. २१ रुग्ण आढळले त्यातील वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला आहे. घाबरण्याचं कारण नाही. केंद्रासोबत मिळून आम्ही यावर तपास करत आहोत असं त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button