मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून सुरू झालेलं नवाब मलिक विरुद्ध मुंबई एनसीबी युद्ध अजून संपलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनेकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर टीका केली आहे. नवीन वर्षात मलिकांनी आज पहिली पत्रकार परिषद घेऊन भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे. एनसीबीच्या पंचांच्या माध्यमातून खोट्या सह्या, खोटी प्रकरणे चर्चेत आली असतानाच एक संभाषण समोर आणत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीने जुनी प्रकरणे दुरूस्त करण्यासाठी जे पंच बनवले होते, त्यांनाच फोन करून जुन्या तारखेनुसार पंचनामा सुधारण्यासाठीचा प्रयत्न केला गेल्याचे संभाषण नवाब मलिकांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले. एनसीबीच्या प्रकरणातील एक पंच आणि एनसीबी अधिकारी तसेच समीर वानखेडे यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी यावेळी पुरावा म्हणून मांडले.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधला. यावेळी मलिक म्हणाले, एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरुच आहे. २०२१ मध्ये एनसीबीने खोटे आरोप दाखल केले जात होते, मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. क्रुझवरील रेडनंतर अनेक प्रकरणं पुढे आली. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
Addressing the Press Conference. https://t.co/WNeQDVEuKu
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022
मलिक म्हणाले, २ ऑक्टोबर २०२१ क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू आहे. एनसीबीचीचा मॅडी नावाचा पंच आणि किरण बाबू नावाचा एनसीबीचा अधिकारी यांच्यातील हा संवाद आहे. या संभाषणात एनसीबी अधिकारी किरण बाबू हा पंच मॅडीला बॅकडेटला पंचनाम्यात सही करा असे सांगतो आहे. जून महिन्यातील एका प्रकरणात ही सही करण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामध्ये पंच घाबरतोय आणि तयार नाही असे असतानाही एनसीबीचे अधिकारी त्याच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे यांच्यासोबतही या पंचाने संभाषण साधले असता, त्यांनीही सही करायला जायला सांगितल्याचे हे संभाषण आहे. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. यावेळी, कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे.
गेल्या वर्षात अनेक खोटी प्रकरणे एनसीबीने केली. त्यामध्ये खोट्या सह्या घेण्यापासून फिल्म सेलिब्रिटींकडून कोट्यावधीची वसुली केली गेली. तसेच बॅकडेटेड सह्या करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक यांनी पंच आणि अधिकारी यांच्यातील संभाषण मांडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. मी जेव्हा वानखेडेंविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात मानहानीचा दावा केला. पण कोर्टात बाजू मांडताना एनसीबी किंवा केंद्रीय यंत्रणांबाबत आवाज उचलण्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. मी तपास यंत्रणांच्या गैर कारभारावर बोलतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डीजी एनसीबीवर काय कारवाई करणार ? समीर वानखेडेवर कारवाई करणार का ? असाही सवाल त्यांनी केला.
समीर वानखेडेंसाठी गृह मंत्रालयात लॉबिंग
मलिक पुढे म्हणाले, समीर वानखेडे बातम्या प्लांट करतायत की मला एक्सटेन्शन नकोय. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे, पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. ३१ तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिलं जावं, असा आरोपही मलिक यांनी केला.
सगळ्यांची पोलखोल करणार
यावेळी मलिक यांनी एनसीबीकडून समीर वानखेडे याच्या जामिनाविरोधात अपील करण्यात आल्याचा आक्षेप घेतला. मुख्य आरोपी करन सजनानी आहे. ६ आरोपी आहेत, मग फक्त समीर खानच्याच विरोधात अपील का केले गेले? करण सजनानीच्या घरुन हा माल पकडला गेला. गांजा म्हटले, पण तंबाखू होती. राहिल फर्नीचरवालाच्या विरोधात अपील केली नाही. फक्त समीर खानच्या विरोधात अपील करून प्रसिद्धीचा खेळ सुरू केला गेला. हे सगळं मला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम केलं. आमच्या घरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मी कुणालाही घाबरणार नाही, मी सगळ्यांची पोलखोल करणार, असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
भाजप समर्थक ‘सुल्ली डिल्स’सारखी पोर्टल चालवतात
गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे आणि पत्रकारांचे काही फोटो अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरूनही नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. इंटरनेटवर अशाप्रकारचे पोर्टल केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे काही समर्थक चालवत आहेत. त्यांनी काही बोर्ड, ट्रोल आर्मी निर्माण केली आहे. या सर्व कामासाठी केंद्राची पाठराखण आहे. यावरून कोणाचे दुमत होऊ शकत नाही.” असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून आरोपींविरोधात कारवाई करत अटक करण्याची मागणी करणार असल्य़ाचे त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, सुल्ली डिल्स नावाचे एक ऑनलाईन पोर्टल आहे. त्या पोर्टलवर महिलांचे फोटो वापरुन बदनामकारक उद्योग या देशामध्ये सुरु आहेत. त्यात बहुतांश अल्पसंख्यांक समाजाच्या मुली आहेत. ज्या समाजात काही चुकतं घडत असेल तर स्पष्टपणे आपलं मतं मांडतात. मात्र कुठेतरी या मुलींची बदनामी करण्याचे काम या पोर्टलच्या माध्यतातून सुरु आहे. या घटनेची आम्ही निश्चित रुपाने निंदा करतोय. मी स्वत: याप्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे.
जे कोणी आरोपी हे पोर्टल चालवत असतील तर त्यांना अटक झाली पाहिजे. कारण यात मुंबईतील काही मुली आहेत. त्यांच्याबाबतीत हे काय नव्याने घडतं नाही. यापूर्वीही अशाच काही पोर्टलच्या माध्य़मातून असे सगळे उद्योग सुरु होते. महिलांची अब्रू धुळीला मिळवण्यासाठी त्यांचे फोटो पोर्टलवर टाकणे यापेक्षा मोठा गुन्हा होऊ शकत नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून संबंधीत प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत अटक करण्याची मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची पत्रकारांची माहिती, फोटो इंटरनेटवरील बुल्ली बाई नावाच्या अॅपवर अपलोड करुन बदनामी केली जातेय. प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, तर अनेक महिलांनी देखील या सोशल मीडिया अकाऊंटविरोधात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.अलीकडेच सुल्ली डिल्स (Sulli Deals) नावाचा असाच एक प्रकार उघडकीस आला होता.