खराब होते इंजिन, पण बदलले डब्बे; मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसची बोचरी टीका

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. यावेळी ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी १२ जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.
मोदी सरकारमधील प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बिहारमधील काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर बोचरी टीका केली आहे. ‘खराब तर इंजिने होते, पण डब्बे बदलण्यात आले,’ असे म्हणत किर्ती आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
बिहारचे नेते असलेल्या आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपात असताना त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते. आझाद यांनी २०१४ मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा ३४,००० मतांनी पराभव केला होता. तर, ते भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.



