भाजपचा पराभव म्हणजे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठी आझादी : मेहबूबा मुफ्ती
श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपवाले समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेषाची भावना पसरवत असून, ते इंग्रजांपेक्षेही वाईट आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणे म्हणजे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठी बाब आहे, या शब्दांत मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित नाही. सत्ताधारी भाजपने विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. मात्र, देशातील तरुण वर्गाने न डगमगता, न घाबरता देशभरात मैत्रीची भावना समृद्ध करायला हवी आणि आव्हानांना निडरपणे सामोरे जावे, असे आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप पराभूत होऊन, या पक्षापासून मुक्त होणे, ही १९४७ पेक्षाही मोठी आझादी असेल, अशी टीका करत, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यांना (भाजप) औरंगजेब आणि बाबर आठवत आहेत. भाजपला हुसकावून लावण्याची संधी मिळाली आहे. १९४७ च्या भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा ही मोठी आझादी असेल कारण त्यांना देशाची फाळणी करायची होती, या शब्दांत मुफ्ती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.