Top Newsराजकारण

शरद पवारांना खुर्ची दिल्यामुळे टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा सडकून समाचार

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताबद्दल देशाला शंका

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी खुर्ची आणत असताना दिसत आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राऊतांवर टीका केली. त्या टीकेला राऊतांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं. ज्येष्ठांचा आदर करणं हा आमच्यावर झालेला संस्कार आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं बंद करा, असं राऊत म्हणाले. दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. मात्र तरीही त्यांच्या चॉपरला अपघात झाला. या अपघाताबद्दल देशवासीयांच्या मनात शंका आहे, असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले १२ खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर धरणं आंदोलन करत आहेत. त्यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचले होते. पवारांचं वय जास्त आहे. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यामुळे मी त्यांना खुर्ची आणून दिली. ज्येष्ठांचा आदर करणं, त्यांचा सन्मान करणं हा आमच्यावर झालेला झालेला संस्कार आहे. त्यावरून कोणाला राजकारण सुचत असेल तर ती संस्कृती नव्हे, विकृती आहे अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांचा समाचार घेतला.

शरद पवारांच्या जागी लालकृष्ण अडवाणी असते, तरीही मी त्यांना खुर्ची दिली असती. मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव असते तरीही मी त्यांना खुर्ची आणून दिली असती. कारण समोरच्या व्यक्तीला बसण्यासाठी पाट द्यावा असं आपली संस्कृती सांगते. ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना बसण्यासाठी खुर्ची सोडा, समोर उभंही राहू दिलं नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

शरद पवार, लालकृष्ण अडवाणी ही पितृतुल्य व्यक्तीमत्त्व आहेत. बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू आहेत. यशवंतराव चव्हाण यांना मी आदर्श मानतो. ज्येष्ठांचा आदर करावा हा संस्कार मला बाळासाहेबांकडून मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यांना केवळ राजकारण दिसतं, त्यांनी त्यांच्या डोक्यातला कचरा साफ करावा. अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला डंम्पिंग ग्राऊंडमध्ये गाठेल. असेच प्रकार सुरू ठेवलेत, तर राज्यात तुमचं सरकार कधीच येणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना सुनावलं.

रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल शंका

लष्कराच्या गणवेशाचा एक रुबाब असतो. बिपीन रावत हे तर देशाचे सेनापती होते. मात्र तरीही ते आमच्याशी बोलताना तो रुबाब बाजूला ठेवून बोलायचे. काल रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचं वृत्त समजलं, तेव्हा आम्ही संसदेजवळ असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ होतो. बातमी समजताच तिथे मोठा हाहाकार उडाला. या अपघाताबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी रावत यांच्या काही आठवणींनादेखी उजाळा दिला. रावत देशाचे सर्वोच्च सेनापती होते. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानं देशाचं सर्वोच्च नेतृत्त्वदेखील गोंधळलं असेल. त्यांच्याही मनात शंका निर्माण झाली असेल. देशाची अनेक संरक्षणविषयक गुपितं त्यांना माहीत होतं. सर्वोच्च स्थानी असतानाही ते समोरच्या व्यक्तीशी स्वत:चा रुबाब बाजूला ठेऊन बोलायचे, अशी आठवण राऊत यांनी सांगितली.

संरक्षण समितीत अनेकदा रावत यांच्याशी अनेकदा संवाद साधला. संरक्षण समितीत सर्वपक्षीय नेते असतात. त्यांच्याकडून अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. त्या सगळ्या प्रश्नांना रावत उत्तरं द्यायचे. किचकट विषय ते सोपे करून सांगायचे. सगळ्या शंकाचं निरसन करायचे. सामान्य सैनिकापर्यंत बिपीन रावत यांचा संवाद होता, असं राऊत यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button