Top Newsराजकारण

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उडवलेले भाजपचे बार फुसकेच; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : अलीकडे लोक खाल्ल्या मिठास जागताना तर दिसत नाहीत, पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. अर्थात त्यामुळे दूध नासणार नाही. त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल. विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःचे पुरते वस्त्रहरण करून घेतले आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत, अशा शब्दात शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ही म्हटले नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. राज्याचे घटनात्मक प्रमुखच जेव्हा घटनेची पायमल्ली करतात तेव्हा काय करायचे, हा प्रश्न निर्माण होतो, असे म्हणत शिवसेनेने राज्यपाल आणि भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाटय़ घडविण्यात आले त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले.

राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे? महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते.

दाऊद हा राष्ट्रद्रोही आहेच व त्याला पाकिस्तानातून इकडे फरफटत आणायला पंतप्रधान मोदी यांना कोणीच थांबवलेले नाही. वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक मोदी यांनी कराचीत पाठवून दाऊदच्या मुसक्या बांधून आणावे, पण दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढेच आमचे सांगणे आहे. दाऊदच्या विरुद्ध नारेबाजी करून काय फायदा? हिंमत असेल तर दिल्लीतील सरकारने पाकिस्तानात घुसून त्याला खतम करण्याचे शौर्य दाखवावे, पण भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे व त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला. मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यास साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button