Top Newsराजकारण

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले, मंत्रालयावर धडकण्याआधीच सोमय्या, पडळकरांची धरपकड

मुंबई: एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आजही सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी सोमय्या आणि पडळकरांना ताब्यात घेतलं. त्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड संतापले असून आमदार निवास परिसरात संतापाचं वातावरण पसरलं होतं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा न निघाल्याने आजही कर्मचारी संपावर आहेत. त्यात आता भाजपने उडी घेतल्याने या आंदोलनाला हवा मिळाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमय्या आणि पडळकर हे आमदार निवासातून बाहेर पडले आणि मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचं विलनीकरण झालंच पाहिजे… अशा घोषणा द्यायला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या घोषणने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या आणि पडळकर आमदार निवासातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे आंदोलक आणखीनच संतप्त झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही. आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. पण आम्हाला अटक करत आहेत. अनेक वेळा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असं सोमय्या म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी सामान्य कामगारांसाठी आंदोलन उभे केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन कामगारांना भेटावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

पडळकरांना किती वेळा अटक करणार आहात? सरकारमध्ये किती जोर आहे ते पाहायचंच आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकार हे माफिया सरकार आहे, असा हल्लाही सोमय्या यांनी चढवला. तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. पण हे सरकार आम्हाला अटक करत आहे. दडपाशाही करून आमचं आंदोलन चिरडण्याचं काम सुरू आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

हिंमत असेल तर कारवाई करा

यावेळी सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही हल्ला चढवला. आधी किरीट सोमय्या, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचं मलिक म्हणाले होते. त्यांनी हिंमत असेल तर घोटाळे बाहेर काढावे. अशा फालतू धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर कारवाई करा, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. कुणी काही बडबड करावी याला आम्ही गंभीर आरोप म्हणत नाही. इतके दिवस नवाब भाई दाऊद दाऊद असे का करत आहे ते आता कळलं, असा टोलाही त्यांनी लगावला.

पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट ‘मातोश्री’ला ओढलं

एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला २१ कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा ‘मातोश्री’वर जातो. एवढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तर महामंडळ नफ्यात कसं येईल?

कर्मचाऱ्यांना काही देण्याची वेळ आली की काही तरी बहाणा दिला जातो. रोज काही तरी सांगायचं.भानगडी करायच्या असं सुरू आहे. नेहमी महामंडळ तोट्यात असल्याचा बहाणा दिला जातो. महामंडळ फायद्यात येईल कसं? एक डिझेलचा टँकर डेपोला गेला तर एक विकायला जातो. महामंडळ कसं फायद्यात येईल? असा सवाल करतानाच पूर्वी १८ कोटीत तुमचे ड्रेस व्हायचे. आता ९० कोटीत ड्रेस विकत घेत आहे, असा दावाही त्यांनी केला.

भाजप एसटी कामगारांचे माथे भडकवत असल्याचा आमच्यावर आरोप केला जातो. आम्ही तुमची माथी भडकवत आहोत काय? तुम्ही या ठिकाणी मनानेच आलात ना? असा सवाल करून गोरगरीबांवर अन्याय होत असेल तर त्याच्यापाठी खंबीर उभं राहण्याचं काम आमचं आहे. आम्ही विरोधी पक्ष आहोत. ते आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आज आडवाल उद्या काय कराल? असा सवालही त्यांनी केला. दिवाळीचा बोनस म्हणून कामगारांना अडीच हजार रुपये देण्यात आले. अडीच हजारात तेलाचा डबा तरी येतो का? असा सवालही त्यांनी केला.

निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही !

जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर मुंबई सोडणार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केलाय. ३५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचं आंदोलन आहे, पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतुनं आम्ही तुमच्यासोबत आहेत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केली.

प्रवीण दरेकरांचाही ठाकरे सरकारवर घणाघात

संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. पण विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एसा एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय. मला तुमचं दु:ख माहिती आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय. त्यावेळी दरेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

अनिल परब यांच्यावर जोरदार टीका

किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केलीय. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी १०० वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिलाय.

कोल्हापुरात कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न

कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात आज धक्कादायक प्रकार घडला. गगनबावडा आगारातील सदानंद कांबळे नावाच्या कर्मचाऱ्यानं आगारातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदानंद कांबळे नावाचा कर्मचारी गळफास लावून आत्महत्या करत असतानाच उपस्थित कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवत कर्मचाऱ्याला वाचवलं. दुसरीकडे राज्य सरकार आता संपाबाबत आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी समितीसमोर म्हणणं मांडावं. कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button