
मुंबई : कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे पडसात महाराष्ट्रात उमटत असून ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने करण्यात येत आहेत. मुंबईत शिवाजी पार्कात शिवसैनिकांकडून आज आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांत झटापटही झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी केलेल्या विधानावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेने त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडोमारत आंदोलन केले यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांत झटापट झाली.
शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यादरम्यान खासदार अरविंद सावंत यांचा मुंबईतील कन्डीगांना इशारा तुमच्या राज्यातील लोकांना सांगा इथे आम्ही आतापर्यंत सुरक्षित आहोत. पण असा अपमान होत राहीला तर आमची सुरक्षितता धोक्यात येईल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीमाना भाजपने घ्यावा. ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागता त्यांचा अपमान तुम्हाला शुल्लक वाटतो का? असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुग्धाभिषेक
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ठिकठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला.
पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात , देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत असे स्पष्ट शब्दांत सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे.
बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.




