ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यास ५ लाखांची लाच घेताना अटक

ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने ५ लाख रुपये लाच घेताना अटक केली. डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. सध्या कोविड काळात सर्व कंत्राटे आणि हॉस्पिटल विषयक व्यवहार त्यांच्याच माध्यमातून केले जात होते. याच गोष्टीचा गैरफायदा मुरुडकर यांनी घेऊन कंत्राट देण्यासाठी लाच मागितली आणि ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमिनोशॉप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ठाणे महानगर पालिकेला 30 व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी निविदा भरल्या होत्या. ही निविदा 1.5 कोटींची होती. ती मंजूर करण्यासाठी मुरुडकर यांनी एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 15 लाखाची मागणी केली होती. त्यापैकी 5 लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारण्यासाठी आज ते स्वतःच्या लाईफ लाईन या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी आले होते. तिथे आधीच लाच लुचपत प्रतिबंधक टीम सापळा लावून हजर होती. त्यामुळे ही लाच घेताना मुरुडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
डॉ. मुरुडकर हे पहिल्यांदाच चर्चेत आले असे नाही. मागील महिन्यात एका आरटीआय कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत मुरुडकर यांची स्वतःची ४ खासगी रुग्णालये असल्याचा आरोप केला होता. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील कोविड हॉस्पिटलमधील साधनसमग्री चोरल्याचा आरोप केला होता. त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.




