राजकारण

मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करण्याचा ठाकरे सरकारचा डाव : आशिष शेलार

मुंबई : पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय? यापुढची एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार आहे काय? राजाबाई टॉवरच्या बाजूला आता दुसरा मिनार उभा करणार आहात काय? विद्यापीठांची उपकेंद्रे शिवसेना शाखेतून वाटले जाणार आहेत काय ? परीक्षांची काठिण्यपातळी, अभ्यासक्रम शिवसेना शाखेमध्ये ठरवणार आहात काय ? अशा आक्रमक प्रश्नांचा भडिमार करीत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला

महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणीच्या बैठकीत आज शेलार यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करणारा ठराव कार्यकारणीत मांडला त्या ठरावावर शेलार प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठ कायद्यात बदल करताना विद्यमान सरकारने कसा राजकीय चंचूप्रवेश केला आहे. कसे राज्यपालांचे, कुलगुरूचे अधिकार सीमित केले आहेत व विद्यापीठांची स्वायत्ता धोक्यात आणली गेली आहे, यावर सविस्‍तर मत मांडलं. या विधेयकाच्‍या उद्देशांमध्‍ये ज्‍या बाबी सरकार सांगते आहे त्‍याचा आणि केलेल्‍या बदलांचा समन्‍वय नाही. किंबहुना हे म्‍हणजे बिरबलाच्‍या खिचडीसारखे आहे असे न म्‍हणता आघाडी सरकारचा विषय असल्‍याने हे बिरबलाच्‍या बिर्याणी सारखा प्रकार असल्‍याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

शेलार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब समाजातील विद्यार्थी, पत्रकार, बुध्दीवान, विचारवंत, पालक यांच्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे याचीही मुद्देसुद मांडणी केली. या कायद्याचे भविष्यात विद्यापीठांवर होणारे परिणाम किती दाहक असतील या विषयावर बोलताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्‍ला चढवला. महाराष्‍ट्रातील सरकारने जेव्‍हा स्‍वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्‍या विरोधी भूमिका घेते त्‍यावेळी सावरकरांच्‍या बाजूची भूमिका मांडली म्‍हणून योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठातून काढून टाकण्‍यात आले. यावरुन स्‍पष्‍ट होते की भविष्‍यात जे सरकारी पक्षांच्‍या विचारांचे वाहक असतील तरच त्‍यांना कुलगुरू केले जाईल. जो सरकारी पक्षाचा लाळघोटेपणा करील त्‍यालाच कुलसचिव केले जाईल असाच एखाद्याला परिक्षा नियंत्रक केले जाईल. यापुढे परिक्षांचे वेळापत्रक, काठिण्‍यपातळी, विद्यापीठांचे अभ्‍यासक्रम, पुस्‍तके, पुस्‍तकांचे रंग शिवसेना शाखेत ठरवले जातील. प्राध्‍यापकांना सरकारी पक्ष त्‍यांचा प्रचार करायला उतरवेल, जो पक्षाचा प्रचार करेल त्‍यालाच प्राध्‍यापक म्‍हणून घेतले जाईल, त्‍यासाठी हा चंचूप्रवेश केला जात आहे. मंत्र्यांना त्‍यासाठी अधिकार दिले जात आहेत. त्‍यांच्‍या मर्जितील माणूस विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदी असेल तर विद्यापीठातील भूखंड वाटप सोपे जाईल यासाठी हा चंचूप्रवेश करण्‍यात येत आहे. मी सांगेन तेच धोरण आणि मी बांधेन ते तोरण याच अहंकारातून हा कायदा करण्‍यात आल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय.

महाराष्‍ट्र विद्यापीठ कायद्यात बदल जो करण्‍यात आला आहे तो आजपर्यंतच्‍या महाराष्‍ट्राच्‍या शिक्षणा‍विषयीच्‍या लौकीकाच्‍या आणि नव्‍या राष्‍ट्रीय धोरणातील उद्देशाच्‍या विरोधात आहे हेही त्‍यांनी लक्षात आणून दिलं. शेलार यांनी हे आपण बोलतोय हे केवळ विरोधाला विरोध करण्‍यासाठी नाही, तर भावी पिढीसाठी बोलतोय, कोणत्‍याही राजकीय हेतूने आणि फायद्यासाठी बोलत नाही, भविष्‍यातील पिढयांसाठी बोलत आहोत. भविष्‍यात जर महाराष्‍ट्रातील विद्यापीठांनाही जेएनयुप्रमाणे राजकीय आखाडा करायचा नसेल तर या बदलामुळे भविष्‍यात उद्भवणारे धोके आपल्‍याला समाजासमोर मांडावे लागतील, असं आवाहनही त्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button