
कोल्हापूर: कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला होता. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असं सांगतानाच इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कपटी नाही. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी आता राज्य सरकारला डिवचण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजे. १४ राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. २०२४ ला काय करायचे ते जनता ठरवेल, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. भाजपने पोटनिवडणुकीत एकूण जास्त जागा जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात. संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी केदारनाथच्या विकासावर भाष्य केलं. तीन टप्प्यात केदारनाथ इथला विकास केला जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा आज पूर्ण झाला. केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या आपत्तीनंतर याठिकाणी कुणी पोहचेल असं वाटत नव्हते. मात्र आता हे सगळं हळूहळू पूर्ववत होत आहे. २०१३ मध्ये मोदी केदारनाथला आल्यानंतर याठिकाणी सुखसुविधा तयार करायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार सर्व घडत आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुक्ताईनगरातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली. सूर्याला दिवा दाखवण्यापेक्षा मतदारसंघात काय बोंब पाडता याकडे लक्ष द्या, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. खासदार रक्षा खडसे यांचा अभ्यास कमी आहे. करोडो लोकांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. त्यामुळे खासदार यांनी केलेल्या टीकेला एवढं गंभीरपणे घेण्यासारखं नाही, असं मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. रक्षा खडसे यांनी घोषणा करून आणि भाषणे करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. ठाकरे सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका केली होती.