मुंबई : प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मात्र, कोरोना काळामुळे खासगीकरणाच्या प्रक्रियेला काहीसा उशीर होत असल्याचे सांगत आहे. आर्थिक चणचणीमुळे एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक मालमत्ता विकत असल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता मुंबईतील नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीबाबत ठाकरे सरकारने पुन्हा चर्चा सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव एस. जे. कुंटे यांनी मंगळवारी एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल यांच्यासोबत बैठक केली. ठाकरे सरकार १,४०० कोटी रुपयांत ही इमारत खरेदी करण्यास इच्छूक आहे. मात्र, एअर इंडियाने इमारतीची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचे बैठकीत सांगितले.
एअर इंडियाची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. एअर इंडियाने खर्च म्हणून राज्य सरकारला ४०० कोटी रुपये देणे आहे. त्यामुळे या संपूर्ण करारावर २ हजार ४०० कोटी रुपये खर्च होतील. एअर इंडियाला जर इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर त्यांनी मूल्यांकनाची प्रत द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे. इमारतीच्या प्रस्तावीत विक्रीबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचे कुंटे यांनी कबूल केले.