पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी स्पष्ट केले. लेखन सराव कमी झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तासांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा देता येणार असून त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येणार असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुठलाही गोंधळ मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तयारीला लागावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आणि बारावीसाठी १४ लाख ७२ हजार ५६५ आवेदन पत्र मिळाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष होणार आहेत. विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आलेले नाही. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा केंद्रेही वाढवण्यात आली आहेत. शिवाय परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांना कमी प्रवास करावा लागेल आणि परीक्षा देताना परिचित वातावरणही मिळेल.
दहावीची लेखी ऑफलाईन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळेच परीक्षा उशिराने घेण्यात येत आहे. त्याचसोबत अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात येवून लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्यासक्रमावरच करण्यात आले आहे, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.
४० ते ६० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ७० ते ८० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वेळ वाढवूव देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावे लागेल. त्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था झिगझॅग पद्धतीची असेल. अपरिहार्य कारणामुळे एखाद्या विद्यार्थ्याची संधी हुकल्यास त्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी दुसर्या प्रात्यक्षिक परीक्षा ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होतील. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे, असे गोसावी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
– कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा परिक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान ती पुन्हा देण्याची संधी
– प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून होण्यापासून ३ मार्चपर्यंत होणार
– यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार.
– प्रॅक्टीकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक बहिस्थ परिक्षक म्हणून यावेळेस नसतील. तर त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परिक्षक म्हणून काम करतील.
– मुख्य परिक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.
– परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी असतील आणि ते झीग झ्याग पद्धतीने बसतील.
– परीक्षे दरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल.
– तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकाल लागण्याच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.
– परीक्षेनंतर ४० ते ४५ दिवसांमधे निकाल लावण्यात येणार.
– जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा होऊ शकते.
– परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल.
– दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.