बेस्टसाठी टेंडर दोनशे गाड्यांचे; आदेश नऊशेचे; मनसेची उद्या बेस्ट भवनवर धडक
मुंबई : बेस्टच्या ताफ्यात दोनशे दुमजली बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने भाडेतत्त्वावर नऊशे बसगाड्यांचा निर्णय घेतला. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतरही संबंधित कंपन्यांशी कोणतीही वाटाघाटी न करता प्रति कि.मी. ५६.४० रुपयांमध्ये हे कंत्राट देण्यात आले. यामुळे बेस्टचे नुकसान झाले असून मर्जीतील ठेकेदारांची तुंबडी भरण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाजपने न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली असून मनसे शिष्टमंडळ सोमवारी बेस्ट भवनावर धडक देणार आहे.
बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील २०० दुमजली इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाने सादर केला. मात्र सत्ताधारी शिवसेनेने उपसूचना मांडत थेट नऊशे बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे सर्वात कमी बोली लावणाऱ्या कॉसेस इमोबिलिटी या कंपनीला सातशे बसगाड्या तर स्विच इमोबिलिटी या कंपनीला दोनशे बसगाड्या प्रति कि.मी. ५६.४० रुपयांमध्ये विभागून देण्यात आल्या आहेत. बसगाड्यांची संख्या वाढवता येणार नाही, असा नियम असताना थेट ७०० बसगाड्या वाढविल्याने अंतर्गत अर्थकारणावर संशय व्यक्त केला जात आहे.
असे आहेत आक्षेप…
– दोनशे बसगाड्यांसाठी निविदा मागवल्याने कंपन्यांकडून अल्प प्रतिसाद आला. त्यामुळे चांगली स्पर्धा निर्माण झाली नाही.
– दोनशे बसगाड्यांसाठी निविदा मागविल्याने प्रति कि.मी. ५६.४० दराची बोली लावण्यात आली. त्याऐवजी ९०० बसगाड्यांसाठी जास्त कंपन्यांनी निविदा भरून आणखी कमी दर मिळाले असते.
– नऊशे बसगाड्यांसाठी कंत्राट देताना दर कमी करून घेण्यासाठी वाटाघाटी होणे अपेक्षित होते.
– नियमांचे उल्लंघन करीत अतिरिक्त सातशे बसगाड्यांसाठी निविदा न मागवता कंत्राट देण्यात येत आहे.