वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा
मुंबई : जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
निवड समितीने पुन्हा एकदा युवा पृथ्वी शॉवर अविश्वास दाखवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीला संधी मिळाली नाही. पृथ्वीने विजय हजारे करंडकात आणि आयपीएलच्या १४ व्या मोसमात शानदार कामगिरी केली. पृथ्वीने आपल्या नेतृत्वात विजय हजारे स्पर्धेत संघाला जेतेपद जिंकून दिलं होतं. तर आयपीएलच्या १४ व्या मोसमातील ८ सामन्यात ३०८ धावा केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीचं कसोटी संघात कमबॅक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरीस पृथ्वीच्या पदरी निराशा पडली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, ४ ते ८ ऑगस्ट
दुसरी कसोटी, १२ ते १६ ऑगस्ट
तिसरी कसोटी, २५ ते २९ ऑगस्ट
चौथी कसोटी, २ ते ६ सप्टेंबर
पाचवी कसोटी, १० ते १४ सप्टेंबर.
असा आहे भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,
सलामीला कोण उतरणार?
बीसीसीआयने २ सलामीवीरांच्या जागेसाठी ३ जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल यांना संधी देण्यात आली आहे. तर केएल राहुलला संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल.
शुभमन गिल :
शुभमनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातूनल कसोटी पदार्पण केलं. शुभमनने तेव्हापासून ७ सामन्यांमधील १३ डावात ३४.३६ सरासरी आणि ५८.७ च्या स्ट्राईक रेटने ३ अर्धशतकांसह ६४४ धावा केल्या आहेत. ९१ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने ही ९१ रन्सची खेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत केली. त्याच्या या खेळीने विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शुभमननेही सलामीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
रोहित शर्मा :
रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १६१ धावांची दीडशतकी खेळी केली होती. तसेच रोहितने वेळोवेळी या मालिकेत छोटेखानी पण महत्वपूर्ण खेळी केली. रोहित अनुभवी आहे. त्याच्याकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. रोहितकडे नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी सांभाळण्याचे कौशल्य आहे.
मयंक अग्रवाल :
मयंकने १४ कसोटीतील २३ डावात ४५.७४ सरासरी आणि ५४.४८ च्या स्ट्राईक रेटने ३ शतक आणि २ द्विशतकांसह १ हजार ५२ धावा केल्या आहेत. मात्र त्याला आपल्या खेळीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे मयंकला अनेकदा संघातून बाहेर पडावे लागले. पण यावेळेस त्याला संधी मिळाली आहे. यामुळे मयंक प्लेइंग इलेव्हनमध्ये ओपनर म्हणून स्थान बनवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
टीम इंडियाचा सलामीवीर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल. काही दिवसांपूर्वी केएलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या. यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे केएलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट बंधनकारक असणार आहे.
हार्दिक पांड्याला डच्चू
जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. गेले अनेक दिवस हार्दिक पांड्या त्याच्या फॉर्मशी झगडतो आहे. त्याच्या बॅटमधून गेल्या बऱ्याच दिवसांपासून रन्स निघत नाहीयत. त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात त्याला अपयश येतंय. याची झलक आयपीएलमध्येही बघायला मिळाली. मुंबईकडून खेळताना हार्दिकला आयपीएलमध्ये बऱ्याच वेळा नामी संधी मिळाली पण त्याने त्या संधीचं सोनं केलं नाही.
हार्दिकने आयपीएलच्या १४ व्या मोसमात ७ सामने खेळले. यामध्ये ८.६६ च्या सरासरीने तसंच ११८.१८ च्या स्ट्राईक रेटने त्याने केवळ ५२ धावा केल्या. संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा त्याची बॅट बोलली नाही. एवढंच नाही तर आयपीएलच्या ७ सामन्यांत त्याने एकदाही बोलिंग केली नाही. मुंबईच्या संघात केवळ बॅट्समन म्हणूनच तो खेळला.