लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या १५ सदस्यांची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लंडन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं २० सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यापैकी १५ जणांची निवड ही १८ जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी करण्यात आली आहे. न्यूझीलंड संघानंही आजच या ऐतिहासिक सामन्यासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला.
भारतानं रोहित शर्मासह सलामीला शुभमन गिलला संधी दिली आहे, तर रिषभ पंत व वृद्धीमान सहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश केला आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा १५ खेळाडूंमध्ये समावेश आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसवले आहे. शार्दूल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.
न्यूझीलंड संघही जाहीर
अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक ३०६ धावा चोपल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ : केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग
भारताचा संघ : रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज.