राज्यात चक्रीवादळ धडकणार नाही; पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार
मुंबई: अरबी समुद्रातील तौत्के या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोक नाही. ते महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. तौत्के हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून ३५० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून हे चक्रीवादळ (Tauktae Cyclone) गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा ‘निसर्ग’प्रमाणे थेट परिणाम जाणवणार नाही. केवळ मुंबई, पालघर, रायगड आणि कोकण परिसरात १६ तारखेला चक्रीवादळच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे शुभांगी भुते यांनी सांगितले. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. चक्रीवादळाचाच हा परिणाम आहे. दक्षिण रत्नागिरी परिसराला पावसाने चांगलेच झोडपले असून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मात्र, आपण या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत. या चक्रीवादळाची सूचना मिळाली तेव्हा आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाला दिलेल्या सूचनांचे योग्य पालन झाले. या भागातील सर्व मच्छिमार बोटी समुद्रातून परतल्या आहेत, असे शुभांगी भुते यांनी सांगितले.
तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नसले तरी किनारपट्टीच्या भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती सुरु आहे. मुंबई, कोकण आणि इतर भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.