Top Newsराजकारण

आ. माणिकराव कोकाटेंच्या उर्मटपणाची राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात चवीने चर्चा !

- विजय बाबर

मुंबई : गावातील इनाम जमिन मिळाली, तर मी आदिवासींसाठी महत्वाकांक्षी योजना राबवेन असे पोकळ आश्वासन गावकऱ्यांना देणे सिन्नरचे (सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे) आ. माणिकराव कोकाटेंना चांगलेच भारी पडलेले दिसते. त्यांच्या या आश्वासनांची खैरात नाकारत एका ग्रामस्थाने जर ती जमिन मिळालीच नाही, तर तोपर्यंत थांबायचं काय, असा प्रतिप्रश्न करताच भंबेरी उडालेल्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी ‘तू खाली बस रे’ म्हणत दमबाजी करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे थेट आमदारांनी, ‘तुला थांबायचं तर थांब नाही तर, गेट आऊट’ अशी भाषा वापरल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ज्यांच्या जीवावर आमदारकी मिळवली तो लोकप्रतिनिधी आपल्या मतदाराला भर बैठकीतून हाकलून लावत असेल तर, अशा आमदाराला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा सूर उमटू लागला आहे.

समाजकारणातून राजकारण करण्याचे दिवस कधीच मागे पडले आहेत. आता अर्थकारणातून राजकारण आणि राजकारणातून अर्थकारण इतकीच मतलबी आणि स्वार्थी मानसिकता लोकप्रतिनिधींची बनली आहे. मतदार राजालाही आता अशा ढोंगी राजकारण्यांची चांगलीच ओळख होऊ लागली आहे. ‘ये पब्लिक है सब जानती है’ हे कळत असूनही पुन्हा पुन्हा मतदारांना उल्ल्लू बनवण्याचा राजरोस कार्यक्रम आजही ग्रामीण भागात सुरु असल्याचेच दिसून येत आहे. सद्यस्थितीत अनेकार्थाने गाजत असणारा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुकाही याला अपवाद नाही. सिन्नरचे विद्यमान आ. माणिकराव कोकाटे यांची विश्वासार्हता आणि लोकप्रियता घटू लागल्याचेच चित्र सध्या सिन्नर मतदारसंघातील गावांमध्ये अनुभवायला मिळत आहे. केवळ सत्ता आणि सत्तेतून पैसे मिळवत पुढारपण गाजवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि सध्या राष्ट्रवादी अशा कोलांटउड्या खात सत्ता उपभोगणाऱ्या आ. कोकाटे यांनी आजवर सिन्नर तालुका वा नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांत किती योगदान दिले हा संशोधनाचा भाग ठरावा. सध्याचे केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला रामराम करीत जे नेते शिवसेनेतून बाहेर पडले त्यापैकी काहींनाच दुसरा, तिसरा घरोबा पचनी पडला. मात्र आमदार कोकाटेंंप्रमाणेच अनेकांना तिसरा, चौथा घरोबाही जुळवून घेताना स्वार्थी वृत्ती आणि सत्तेचा हव्यास आड येतो आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने नाशिक मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर कोकाटेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण हेमंत गोडसे यांनी डोकेच वर काढू दिले नाही. आधी २०१४ ची विधानसभा आणि नंतर २०१९ ची लोकसभा असे सलग दोन पराभव पचवल्यानंतर कोकाटेंनी आपला मोर्चा आपल्या गावाकडे वळवला. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेना युती असल्याचे आणि सिन्नर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने कोकाटेंना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अशा मावळली होती. अशावेळी संधीसाधू कोकाटेंसारख्या राजकीय नेत्याना शांत राहणे शक्य नव्हते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फारसे सख्य नसले तरी केवळ सत्तासुंदरीसाठी त्यांनी ऐन विधानसभेच्या तोंडवर राष्ट्रवादीसोबत नव्याने चौथा घरोबा केला. यावेळी ते सिन्नर तालुक्याचे आमदार म्हणून जेमतेम दोन हजाराचे मताधिक्य घेऊन निवडून झाले.

आ. माणिकराव कोकाटे यांच्या मनमानी राजकारणाला गावागावातून होत असलेल्या विरोधाचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोहोचला आहे. प्रदेश पातळीवरील एका नेत्याने याबाबत कोकाटे यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ कोकाटेंच्या कर्तृत्वाचा पाढाच वाचला. आमदारकीला तीन वर्षे उलटत आली तरी सिन्नर तालुक्यातील विकासकामांना काही मुहूर्त मिळताना दिसत नाही, हे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक गावसभांमधून आमदार कोकाटे पोकळ आश्वासने देतात आणि ग्रामस्थ त्यांना प्रश्न विचारुन, समस्या मांडून हैराण करतात असेच काहीसे चित्र सध्या दिसते आहे. अनेकदा ग्रामसभेत विचारलेल्या रेशनकार्ड विषयीचे प्रश्न, सरकारी आवास योजनेबाबतची तरतूद आणि पूर्तता, आदिवासी, मागासवर्गियांसाठी योजनांच्या पूर्ततेबाबतच्या मागण्या, गाव रस्त्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा विषय अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्याऐवजी, ‘तुम्हाला वाट बघायची असेल तर बघा नाही तर गेट आऊट’, ‘तुझं झालं का, जरा कायदा शिकून घे’, ‘रेशनकार्डवर मिळणारे राशन हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा गावाशी आणि माझ्याशी काय संबध’ अशी अरेरावीची भाषा खुद्द आमदाराकडून आणि त्यांच्या निष्ठावंतांकडून वापरली जाते. याच उर्मटपणामुळे सध्या सिन्नर तालुक्यात आ. कोकाटे यांच्याविषयी कमालीची नाराजी दिसू लागली आहे. न्यायप्रविष्ठ असणारी जमिन आदिवासींच्या महत्वाकांक्षी कल्याण योजनांसाठी, गावच्या स्मशानभूमीसाठी दान देण्याचे भले मोठे जाहीर आश्वासन देताना हे कोकाटे महाशय अजिबातच मागे हटत नाहीत. ही आश्वासने देताना ‘ती जमिन मिळाली, तर मी विकासकामे करेन’ अशी उडवाउडवीची उत्तरे देणे आमदार पदाला न शोभणारे असेच आहे. ‘बाजारात तुरी अन आमदार कोकाटे बाता मारी’ या बोलघेवडेपणाला आता सिन्नरकर पुरते वैतागले आहेत, यात शंका नाही.

नुकत्याच झालेल्या सोमंठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आ. माणिकराव कोकाटे यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. आ. कोकाटे यांच्या पॅनेलचा त्यांचे बंधू भरत शिवाजीराव कोकाटे यांनीच तब्बल सात जागा जिंकून पराभव केला. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो. आ. कोकाटे यांच्या राजकारणाला त्यांच्याच घरातूनच लागलेला सुरुंग भविष्यातील राजकाणाची दिशा ठरवणारी नांदी असल्याचे सिन्नरकर उघडपणाने बोलू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button