तन्मय माझा जवळचा नातेवाईक नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशात ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २२ वर्षांच्या पुतण्याने कोरोना लस घेतलेल्याचा फोटो व्हायरल झाला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नाही. तन्मय फडणवीस माझा जवळचा नातेवाईक नाही. कोणालाही चुकीच्या पद्धतीने लसीकरण करण्याची परवानगी देता कामा नये, असे फडणवीस म्हणाले.
तन्मय माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी माझ्या पत्नी आणि मुलीला पात्र नसल्यामुळे लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे, असं फडणवीस म्हणाले.
तन्मयने पहिला मुंबईत, तर नागपूरमध्ये घेतला लसीचा दुसरा डोस
तन्मय फडणवीसने ज्या रुग्णालयातून लसीचा दुसरा डोस घेतला त्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिलं आहे. तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला, असं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं