
नागपूर : दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. दोन वर्षे झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा, असं फडणवीस यावेळी म्हणाले. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते. देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
उद्धव ठाकरे हे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. परंतु त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे? शिवसेनेकडे जेव्हा उमेदवार नव्हता त्यावेळी भाजपनं त्यांना उमेदवार दिला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधच आहे. ते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस सरकारच्या काळात जसा सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला तसा भाजप करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय शांतही बसणार नाहीत. परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी भीती बाळगावी आणि ज्यांनी केला नाही त्यांनी निश्चिंत राहावं. जर आम्ही संस्थांचा गैरवापर होत असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आता तुरुंगात असतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. कोलकात्याची आजची अवस्था काय आहे हे ठाऊक आहे का?, जो तुमच्या विरोधात बोलतो त्याचं मुंडकं छाटून फासावर लटकवायचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब आहे तोवर आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
इतिहासातलं भ्रष्ट सरकार
ज्या महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत आहात ते इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे हे लक्षात ठेवा. इतिहासात याची नोंद केली जाईल. तुमचा अजेंडा फक्त खंडणी.. खंडणी…, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. काहीही झालं तरी संविधान कोणी बदलू शकणार नाही. काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन काही डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन हा मनसुबा रचला जातोय. तुमचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
घटना बदलण्याचे ठाकरे सरकारचे मनसुबे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे अशा कठोर शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे काही कम्युनिस्ट लोकांना, डाव्या विचारांच्या लोकांना आणि काही पक्षांच्या सोबतीने संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, मनसुबे आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.