मुंबई : राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल. त्या जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबत त्यांनी निर्णय घ्यावेत. निर्णय जाहीर करण्याआधी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, स्थानिक पातळीवर नेमकी परिस्थिती काय आहे? त्यानुसारच आघाडीबद्दलचे निर्णय घ्यावेत; पण विनाकारण सत्ताधारी पक्षांमध्ये कटुता निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नका, असे स्पष्ट आदेशही दिले.
पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत पवार यांनी मंत्र्यांच्या कामाचा आणि त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याला ठाम विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण दिल्याशिवाय या निवडणुका होणार नाहीत, या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, ‘निवडणुकीत निश्चित अशी रणनीती आखूनच सामोरे गेले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती आपल्याकडून होऊ नये, यासाठी बारकाईने नियोजन करा.
जिथे फायदा होईल त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी करा; मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाड्या करू नका, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्या आहेत.