राजकारण

विदर्भात भाजपला धक्का! १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीत झालेली भेट, त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली असून, त्यात आता भर पडण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. एकाचवेळी १० विद्यमान नगरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा घेतलेला निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व नगरसेवक हिंगणघाट नगरपरिषदेमध्ये नगरसेवक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येऊन त्यांनी शिवबंधन बांधले आहे.

भाजपचे स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या कामाला कंटाळून शिवसेना प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे. विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह १० विद्यमान भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला.

कोविडमुळे असलेली संचारबंदी उठताच हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह सतीष धोबे, सुरेश मुंजेवार, मनीष देवढे, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, निलेश पोगले, निता धोबे, संगीता वाघमारे, सुनिता पचोरी, प्रतिभा पडोळे, देवेंद्र पडोळे, डॉ.महेंद्र गुढे यांचा प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पक्षसचिव तथा राज्यसभा सदस्य खासदार अनिल देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे व प्रशांत शहागडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button