राजकारण

केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई : अनिल देशमुख

Action by Central Government out of political hatred: Anil Deshmukh

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपण सार्वजनिक जीवनात कार्यरत असून, राजकीय द्वेषापोटी केंद्र सरकारकडून आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा एकदा या आरोपाचा पुनरुच्चार केला.

ईडीने पाठविलेल्या दुसऱ्या समन्सला मंगळवारी उत्तर देताना, चौकशीला कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्यावेळी भाजप राजकीय कारणास्तव आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करीत असल्याचा उल्लेख त्यांचा नामोल्लेख न करता केला. त्यांनी तीनपानी पत्रात नमूद केले आहे की, केंद्र सरकार तपास यंत्रणेवर दबाव टाकून आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहे. आपल्याला विनाकारण गोवले जात आहे.

ईडीने २५ जूनला माझ्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी छापे टाकून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी माझा जबाबही नोंदविला. तपास यंत्रणेला सर्व सहकार्य करत आलो असून, यापुढेही मी सहकार्य करत राहणार आहे. ‘ईसीआयआर’मध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे मी माझ्या प्रतिनिधींकडून पाठवत आहे. मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. कारण माझे वय ७२ वर्षे असून, विविध व्याधी आहेत. विशेषतः उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे. त्याचबरोबर, सद्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. त्यासाठी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button