शारजाह : पाकिस्तान क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंड संघाला ५ विकेट्सने मात देत पाकिस्तानने गुणतालिकेतही पहिलं स्थान गाठलं आहे. शारजाहच्या मैदानात पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला १३४ धावांवर रोखलं. त्यानंतर मात्र १३५ धावांचं लक्ष्य पूर्ण करताना पाकिस्तानला अडचणी आल्या, पण अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अली यांनी नाबाद खेळी करत संघाला ५ विकेट्सनी जिंकवून दिलं. पाकिस्तानच्या या विजयानं टीम इंडियाला दिलासा मिळाला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शारजाहच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा कस लागणार हे निश्चित होते. त्यामुळेच मार्टिन गुप्तील व डॅरील मिचेल या जोडीनं सावध खेळ केला. पाकिस्तानी गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना किवींच्या धावांचा ओघ रोखला. न्यूझीलंडला ८ बाद १३४ धावा करता आल्या. मिचेल (२७), केन विलियम्सन (२५), डेव्हॉन कॉनवे (२७) यांची झुंज दाखवली. शाहिन शाह आफ्रिदी (१-२१), इमाद वासीम (१- २४) आणि मोहम्मद हाफिज (१-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रौफनं २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
बाबार आजम व मोहम्मद रिझवान ही जोडीच पाकिस्तानला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण, आज बाबर अपयशी ठरला. टीम साऊदीनं त्याचा (९) त्रिफळा उडवला. फाखर जमाननं आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु इश सोढीनं चतुराईनं त्याला बाद केले. मैदानावरील पंचांनी पायचीतच्या अपीलवर नाबाद निर्णय देताच केननं डीआरएस घेतला अन् त्यांना हे यश मिळालं. पाकिस्तानला १० षटकांत ५८ धावा करता आल्या होत्या आणि हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय होता. अनुभवी मोहम्मद हाफिजनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून इरादा स्पष्ट केला, परंतु मिचेल सँटनरनं त्याला ११ धावांवर बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला.
रिझवान खेळपट्टीवर असल्यामुळे किवींची चिंता कायम होती. इश सोढीनं ही चिंता दूर केली. १२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिझवाननं चौकार खेचला, मात्र सोढीनं पुढच्याच चेंडूवर रिझवानला पायचीत करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला. रिझवान ३३ धावांवर माघारी परतला. पाकिस्तानचा निम्मा संघ ८७ धावांवर माघारी परतल्यानंतर अनुभवी शोएब मलिकनं खिंड लढवली. आसिफ अलीनं टीम साऊदीला सलग दोन षटकार खेचून पाकिस्तानवरील दडपण हलकं केलं. पाकिस्तानला अखेरच्या १८ चेंडूंत २४ धावांची गरज होती. १८व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर शोएबनं १२ धावा चोपल्या. मलिक २० चेंडूंत २७, तर आसिफ १२ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं १८.४ षटकांत ५ बाद १३५ धावा करून विजय पक्का केला.
पाकच्या विजयाचा भारताला दिलासा कसा?
पाकिस्ताननं आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे. आता दुसऱ्या संघासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात थेट लढत असेल. त्यामुळे ३१ तारखेचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास त्यांना उर्वरित लढतीत अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांना नमवून ८ गुणांसह सेमीफायनलचं गणित गाठता येईल. भारताविरुद्ध जर न्यूझीलंडनं विजय मिळवला, तर टीम इंडियाला उर्वरित तीनही सामने जिंकून काहीच उपयोग होणार नाही. अफगाणिस्ताननं काही पराक्रम केला, तर कदाचित संधी मिळू शकते. या सर्व समिकरणात अफगाणिस्ताननं काही उलटफेर केला नाही तर या तीन संघांपैकी दोन उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार आहेत. ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ४ गुण व ०.७३८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तान १ विजयासह २ गुण व ६.५०० नेट रन रेटनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, नामिबिया यांच्याशी आहे आणि यात त्यांनी धक्कादायक निकाल नोंदवल्यास भारत व न्यूझीलंड यांना धक्का बसू शकतो.