राजकारण

मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सुशील चंद्र यांनी स्वीकारला

नवी दिल्ली : भारताचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्र यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते १२ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाले. चंद्र हे १५ फेब्रुवारी २०१९ पासून आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. १८ फेब्रुवारी २०१९ पासून ते मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणूनही काम करत आहेत. जम्मू काश्मीर केंद्रसशासित प्रदेशाच्या मतदार संघ पुनर्रचनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेल्या जवळपास ३९ वर्षांपासून प्राप्तिकर विभागात विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे सुशील चंद्र, १ नोव्हेंबर २०१६ – १४ फेब्रुवारी २०१९ या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्षही होते.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत असल्यापासूनच सुशील चंद्र यांनी निवडणुकांमध्ये बेकायदेशीरपणे खेळणाऱ्या पैशाची प्रकरणे उकरून काढण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. ‘आमिष-विरहित निवडणुका’ या संकल्पनेवर त्यांनी कायमच भर दिला असून, आगामी तसेच चालू असलेल्या अशा सर्वच निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक प्रक्रियेवर देखरेख करण्याचा तो एक महत्त्वाचा पैलू ठरला आहे.

आज महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये स्थान असलेल्या ‘फॉर्म-२६’ सह अनेक व्यवस्थात्मक बदलांमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे. उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी भरलेल्या शपथपत्रांच्या पडताळणीसारख्या विषयांतही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुशील चंद्र यांनी विशेष लक्ष घातले. २०१८ मध्ये, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी, अपूर्व योगदान दिलेला आणखी एक विषय आहे- तो म्हणजे- उमेदवारांनी शपथपत्रात उल्लेख न केलेल्या सर्व मालमत्ता आणि कर्जाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सामायिक आराखडा. निवडणूक व्यवस्थेत अभिनव पद्धतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर, हे २०१९ मधील १७व्या लोकसभा निवडणुकीकरिता तसेच विधानसभा निवडणुकांकरिता सुशील चंद्र यांनी दिलेल्या योगदानाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भारतीय निवडणूक आयोग परिवाराने मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना १२ एप्रिल २०२१ रोजी निरोप दिला. आयोगामध्ये ४३ महिने काम केल्यावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुमारे २९ महिन्यांची कारकीर्द पूर्ण केल्यावर ते पदमुक्त झाले. त्यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये १७ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. तसेच सप्टेंबर २०१७ मध्ये निवडणूक आयोगात काम सुरु केल्यापासून २५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button