मनोरंजन

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचे आरोपपत्र दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तब्बल ९ महिन्यांनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात एनसीबी ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांनी मुंबईसत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र जवळपास ३० हजार पानांचे आहे. दोषारोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी नं. १० आहे.

सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये 14 जून 2020 रोजी सापडला. या प्रकरणात ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीने त्याचा तपास सुरू केला. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ते ड्रग पेडलर्सपासून सुशांतच्या मॅनेजरपर्यंत चौकशी केल्यानंतर रिया आणि तिच्या भावाला एनसीबीने अटक केली. रिया चक्रवर्ती तुरुंगात जवळपास महिनाभर घालविल्यानंतर जामिनावर सुटली आहे. रिया चक्रवर्तीशिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचेही नाव एनसीबीच्या आरोपपत्रात आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने आपल्या आरोपपत्रात ३३ जणांची नावे दिली आहेत. रिया चक्रवर्ती आणि शौविक व्यतिरिक्त यात अनेक ड्रग पेडलर्सची नावे आहेत. यातील बहुतेक ड्रग पेडलरना एनसीबीने चौकशीदरम्यान अटक केली होती.

बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी ड्रग्सचं कनेक्शन
तपासणी दरम्यान ड्रग्स माफियांशी बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींशी कनेक्शन जोडले गेलेले आढळले. या ख्यातनाम व्यक्तींची नावे ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीदरम्यान समोर आली. त्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण ते सारा अली खान आणि रकुल प्रीतसिंग ते मधु मंटेना यांची या प्रकरणांची चौकशी केली. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्यांच्या व्यवस्थापकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत चौकशी केली होती. या चौकशी आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे रिया आणि शौविक यांना अटक करण्यात आली. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

रिया आणि शौविक यांच्यावर सुशांतला ड्रग्स पुरविल्याचा आरोप आहे. तथापि, उच्च न्यायालयात रियाला जामीन देताना कोर्टानेही कबूल केले की, रियाने स्वतःहून ड्रग्स विकत घेतले किंवा विकले असा कोणताही पुरावा एनसीबीकडे नाही. रियाने आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, तिने सुशांतला केवळ त्याच्या सांगण्यावरून ड्रग्स दिले. यासाठी सुशांतने पैसे दिले आणि ड्रग्स पेडलर्सची माहिती सुशांतनेही दिली. रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पेडलर्सशी थेट संपर्कात होता.

या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफआयआर नोंदविला होता. सुशांत केसमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणारे एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) यांना रिया आणि शौविकच्या फोनवर ड्रग्स चॅट मिळाले. ईडीने एनसीबीला ही माहिती दिली होती, त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या ड्रग चॅटमध्ये सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा ते दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा अशी नावे होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button