ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार, सीबीआय चौकशीत खरं-खोटं बाहेर येईल : फडणवीस

मुंबई : उच्च न्यायालयाने अतिशय स्पिकिंग ऑर्डर दिली होती. ज्याप्रकारे हे प्रकरण आहे त्यानुसार सीबीआयने चौकशी करावं, असं उच्च न्यायालयाने कारणासह सांगितलं होतं. तरीही राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रयत्न केला. स्वत: अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाबाबत जी टिप्पणी केली आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. महाविकास आघाडीचे नेते याबाबत जे बोलत होते त्यांना उत्तर देण्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलीय. आता योग्यप्रकारे चौकशी होईल. त्यातून काय खरं-खोटं ते बाहेर येईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयची चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली. परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसंच हे प्रकरण मोठे आहे आणि आरोप गंभीर आहेत, त्यामुळे सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही, त्यावर कोणच बोलत नाही
महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका निर्माण झालीय. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.