Top Newsराजकारण

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : शशी थरूर निर्दोष

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने थरूर यांना दोषमुक्त केले आहे. दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने हा निकाल दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर थरुर यांनी न्यायालयाचे आभार मानले असून गेल्या साडे सात वर्षांपासून टॉर्चर आणि वेदनेतून जात होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू १७ जानेवारी, २०१४ रोजी झाला होता. दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा संशयास्पद रित्या मृतदेह सापडला होता. सुनंदा यांनी त्याच्या काही दिवस आधीच शशी थरूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पाकिस्तानी महिला पत्रकाराशी थरुर यांचे अनैतिक संबंध असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

सुनंदा यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर संशयाच्या गर्तेत आले होते. थरूर यांनी सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आणि त्रास दिल्याचे आरोप झाले होते. सुनंदा यांचा मृत्यू खूप हायप्रोफाईल ठरलाहोता. २९ सप्टेंबर २०१४ ला एम्सच्या मेडिकल बोर्डाने सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट दिल्ली पोलिसांना सोपविला होता. यामध्ये सुनंदा यांचा मृत्यू विषारी पदार्थामुळे झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या शरीरात असे काही रसायन सापडले होते, जे पोटात गेल्यावर रक्तात मिसळले की विष बनतात. याशिवाय सुनंदा यांच्या शरीरावर जखमाही आढळल्या होत्या. त्यांच्या खोलीत अल्प्रैक्सच्या २७ गोळ्यादेखील सापजल्या होत्या. मात्र, त्यांनी किती गोळ्या घेतल्या होत्या हे स्पष्ट झाले नाही.

थरुर यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विकास पाहवा यांनी न्यायालयात थरुर यांना आरोपमुक्त करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाने थरुर यांच्यावर मानसिक किंवा शारीरिक पीडा दिल्याचा आरोप केला नव्हता. पोलिसांनी चार वर्षे तपास करून देखील सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण शोधू शकले नाहीत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने हे मान्य करून थरूर यांना दोषमुक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button