सुमित्रा महाजन यांची प्रकृती स्थिर; थरूर यांची फजिती

नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि केरळमधील तिरुअनंतपूरचे लोकसभा खासदार शशी थरूर गुरुवारी रात्री एका फेक न्यूजमुळे चांगलेच अडचणीत आले. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निधनाची फेक न्यूज त्यांनी ट्विट केली. यानंतर थरूर यांची फजिती उडाली. पण काही वेळाने थरूर यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. दुसरीकडे, थरूर यांच्या ट्वीटवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट केले. ताई एकदम स्वस्थ आहेत. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, असं विजयवर्गीय म्हणाले.
सुमित्रा महाजन या आता आपल्यात नाहीत. परमेश्वर चरणी त्यांना स्थान मिळू दे, असं ट्विट शशी थरूर यांनी गुरुवारी रात्री केलं. यानंतर सुमित्रा महाजन यांच्याबाबत इतरांनी शोक व्यक्त केला. पण काही वेळातच सुमित्रा महाजन या ठीक असल्याचं समोर आलं. त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती, असं सांगण्यात आलं. या माहितीनंतर शशी थरूर यांनी ट्विट करून खेद व्यक्त केला आपले ट्विटही डिलिट केले. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कोण उसकवतं, याचं आपल्याला आश्चर्य आहे. सुमित्रा महाजन यांना आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा, असं थरूर म्हणाले.