राजकारण

काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी मजबूत नेतृत्त्वाची गरज : शशी थरूर

कोच्ची : काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी मजबूत नेतृत्त्वाची गरज आहे. पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्षाची गरज असल्याच विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केलं आहे. पक्षातील माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सध्या दुफळी निर्माण झाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. त्यात काँग्रेसला अजूनही कायमस्वरुपी अध्यक्ष प्राप्त झालेला नाही. याबाबत शशी थरूर यांनी महत्त्वाचं विधान केलं. काँग्रेसला एक नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्त्वाची गरज आहे. नव्या नेतृत्त्वानंतर केरळमध्ये नक्कीच बदल स्पष्टपणे दिसून येतील आणि याचा पक्षालाही बळकटी मिळेल, असंही थरूर म्हणाले.

इडुक्की जिल्ह्यातील थोडुपुझामध्ये आयोजित एका पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शशी थरूर यांनी महत्त्वाची नोंद केली. सोनिया गांधी यांनी इतक्या वर्षांपासून पक्षाचं यशस्वीरित्या नेतृत्त्व केलं आहे. त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं आहे. पण त्यांनी आता स्वत: आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अशातच आता पक्षाला नव्या अध्यक्षाची नेमणूक करायची गरज आहे, असं थरूर म्हणाले. राहुल गांधी यांनीच पक्षाचं नेतृत्त्व करावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला अध्यक्षपदासाठी पर्याय शोधावा लागेल. कारण पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्षपदाची गरज आहे आणि या प्रक्रियेला आता गती येणं देखील गरजेचं आहे, असंही थरूर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button