यंत्रणांवर ताण मान्य, पण सरकार बोध घेणार की नाही : राज ठाकरे

मुंबई : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ जणांनी आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालय या कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण यातून सरकार बोध घेणार की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेली आग ही दुर्दैवी आणि क्लेशदायी असल्याचं म्हटलं आहे. भंडाऱ्यातील घटना असो की भांडूपमधील घटना तसंच परवाच घडलेली नाशिकमधील घटना असो यातून सरकारने बोध घ्यायला हवा. प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तत्काळ ऑडिट करून घ्यायला हवं आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडाऱ्यातील घटना असो की भांडूप मधली घटना. या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्था, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तत्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.