महाराष्ट्रात कोरोनाचे पुन्हा थैमान; सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांवर कोरोना रुग्ण
मुंबईची चिंता वाढली; धारावीला पुन्हा संसर्गाचा विळखा
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ८ हजारपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८ हजार ७०२ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार कसा रोखावा? याचा आदर्श जगापुढे निर्माण करणाऱ्या धारावीत आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे. ३७ दिवसांनंतर बुधवारी दोन अंकी रुग्णांची नोंद या भागात झाली होती. तर गुरुवारी नऊ बाधित रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यावेळेस येथील झोपडपट्टीमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.
राज्यात मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोना मृत्यूंचा आकडा ५१ हजार ९९३ वर पोहोचला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ६४ हजार २६० वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांचा हा आकडा काळजी वाढवणारा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख २९ हजार ८२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.४९ टक्के इतकं आहे.
मुंबईत १ हजारांहून अधिक रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १ हजार १४५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे.
एप्रिल २०२० मध्ये धारावीत कोरोनाचा प्रसार सुरू झाला, व झपाट्याने वाढू लागला. आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी येथे असल्याने धारावी मध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या. या प्रयत्नांना यश येऊन धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर आली. धारावी पॅटर्नचे अनुकरण इतर देशातही होऊ लागले. धारावी ने आतापर्यंत शून्य रुग्ण संख्येचा षटकार मारला आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्ण संख्येत वाढ होत असताना धारावी परिसरातही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केवळ १२ सक्रिय रुग्ण असलेल्या धारावीत आता ३७ रुग्ण आहेत. पुनश्च हरिओम झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन सुरू झाले आहे, मास्क न लावणे, गर्दी करणे, सुरक्षित अंतर न पाळणे अशा बेजबाबदार वर्तनामुळे संसर्ग वाढू लागला असल्याची नाराजी पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.